अळिंबीचा आहारामध्ये सुपरफुड म्हणून समावेश करणे गरजेचे:- सहाय्यक महासंचालक डॉ. सुधाकर पांडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
अन्नधान्य उत्पादनात भारताचे वर्चस्व आहे. यामध्ये पौष्टिक अन्न सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने अळिंबीचे पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म तसेच अळिंबी उत्पादनास लागणारे कमी पाणी, अल्प खर्चिक प्रक्रिया व मूल्यवर्धन तंत्रज्ञानाचा विचार करता अळिंबी उत्पादनास प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी अळिंबीचा आपल्या आहारामध्ये सुपरफुड म्हणून समावेश होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. सुधाकर पांडे यांनी केले.


कृषि महाविद्यालय, पुणे येथे अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्पांतर्गत 27 व्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधाकर पांडे बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या पुष्प विज्ञान अनुसंधान प्रकल्पाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील अळिंबी संशोधन प्रकल्पाचे संचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. वेदप्रकाश शर्मा, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने व अळिंबी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. राजेंद्र खडतरे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की अळिंबी उत्पादनास लागणारी मर्यादित संसाधने व कमी गुंतवणूक यामुळे ग्रामीण तसेच अर्ध शहरी भागातील शेतकर्यांसाठी अळिंबी उत्पादन रोजगार निर्मिती व उत्पन्न वाढीसाठी उत्तम संधी आहे. अळिंबी उत्पादन तंत्रज्ञानाची सेंद्रिय शाश्वत शेती सोबत सांगड घालून प्रभावी व पर्यावरण पूरक नियंत्रण उपाययोजनांसाठी अधिकचे संशोधन होणे गरजेचे आहे. यावेळी डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी आपल्या मार्गदर्शनात अळिंबीचे आपल्या आहारात प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे नमूद केले. डॉ. वेदप्रकाश शर्मा यांनी भारतामध्ये कार्यरत विविध अळिंबी संशोधन प्रकल्पांच्या कार्याचा आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर केला. याप्रसंगी उत्कृष्ट अळिंबी संशोधनकार्यासाठी इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय रायपूर तसेच उत्कृष्ट विस्तार कार्याबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषि विश्वविद्यालय, समस्तीपुर या प्रकल्पांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अळिंबी संशोधन उत्पादन तंत्रज्ञान व प्रशिक्षण या विषयावरील विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महानंद माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ. राजेंद्र खडतरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध अळिंबी संशोधन प्रकल्पांचे शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *