महात्मा फुले कृषी विद्यापीठात बियाणे उत्पादन आढावा व कृषी विकास समन्वय समितीची बैठक संपन्न…

Uncategorized

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने लक्षांकापेक्षा मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन घ्यावे:-
कुलगुरू डॉ. शरद गडाख…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केंद्र शासनाच्या कृषी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी बीज उत्पादक संस्थांकडून मागणी केल्याप्रमाणे मूलभूत बीजोत्पादन लक्षांकांपेक्षा जास्त करावे. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व बियाणे उत्पादक खासगी कंपन्या यांची बियाण्यांची गरज भागून उर्वरित बियाणे सत्यप्रत करून शेतकऱ्यांना वितरित करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना विद्यापीठातील विविध वाणांचे सत्यप्रत बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे 22 वी बियाणे उत्पादन आढावा व कृषी विकास कार्यशाळा समन्वय समितीची बैठक कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. ही आढावा बैठक संशोधन संचालक तथा सदस्य सचिव, बियाणे उत्पादन आढाव समिती डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव तथा प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनाखाली पार पडली. याप्रसंगी नियंत्रक श्री. सदशिव पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे, बियाणे महामंडळ, अकोल्याचे बीज प्रमाणीकरण संचालक डॉ. अंकुश माने, अहिल्यानगर बियाणे विभागाचे डॉ. बी.जी. पाटील, श्री.एन. एम अभंग, श्री. सुनील दौंड, राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे श्री. नागराज बी. एस., श्री. सौरदीप बोस उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त पुणे यांचे प्रतिनिधी श्री. महेश झेंडे हे ऑनलाइन उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला डॉ. नितीन दानवले यांनी बियाणे विभागाचा संक्षिप्त आढावा सादर केला. यावेळी त्यांनी 21 व्या आढावा बैठकीच्या इतिवृत्तावरील कार्यवाही अहवाल व मागील वर्षी बियाणे विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. बीज उत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शेत पिकांच्या बीज उत्पादन कार्यक्रमांचे सादरीकरण केले. डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी भाजीपाला बीज उत्पादन व डॉ. सचिन मगर यांनी फळ पिकांच्या रोपे उपलब्धीचे सादरीकरण केले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र भिलारे यांनी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ऊस बिजोत्पादन त्याचप्रमाणे डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. उत्तम कदम, डॉ. भीमराज कांबळे या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत उत्पादित विविध फळे पिकांच्या रोपांची उपलब्धता, जैविक खते, जैविक औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच श्री. समीर पवार यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांचे सादरीकरण केले. ही आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी प्रा. बी.टी. शेटे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अविनाश कर्जुले, श्री. बी.जी. राठोड, श्री. आदिनाथ ढगे, श्री. संदीप कोकाटे व बियाणे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन बियाणे विपणन अधिकारी डॉ. दिलीप ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *