शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत:- राधाकृष्ण विखे पाटील…

Uncategorized

लोणी येथे डाळींब बहार मेळावा व कृ‍षी प्रदर्शनाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- आधुनिक तंत्रज्ञान व जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्‍पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.
डाळींबरत्‍न बाबासाहेब गोरे यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे, नाशिक जिल्‍ह्यातील डाळींब उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी लोणी येथे आयोजित केलेल्‍या ‘डाळींब बहार मेळावा’ व ‘कृ‍षी प्रदर्शनाचे’ उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी ह.भ.प महंत उद्धव महाराज मंडलीक, जिल्‍हा अधीक्षक कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, बाजार समितीचे उपसभापती आण्‍णासाहेब कडू, महाराष्‍ट्र पशू व मत्‍स्य विद्यापीठाचे सदस्‍य ऋषिकेश खांदे, तालुका कृषी आधिकारी आबासाहेब भोरे, सतीश बावके, संदीप निर्मळ, सचिन चिंधे, हर्षल खांदे यांच्‍यासह डाळींब उत्‍पादक शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्‍हणाले की, कृषी क्षेत्रामध्‍ये नैसर्गिक आणि मानव निर्मित आव्‍हाने निर्माण होत असले तरी, यावर मात करुन, तरुण शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळत आहेत. या शेतकऱ्यांना बाबासाहेब गोरे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे.

सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे धोरण उपयुक्त ठरेल. तसेच, निर्यातक्षम उत्पादन वाढवण्यासाठी कृषी संस्थांनी शासनाबरोबर एकत्र येऊन मार्गदर्शन करावे. देशाच्‍या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा वाटा महत्त्वपूर्ण असल्‍याने केंद्र व राज्‍यशासन शेतकऱ्यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांंनी दिली.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले, नुकत्‍याच सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पातही कृषीक्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्‍यात आल्‍या आहेत. केंद्र शासनाने नेहमीच प्रक्रिया उद्योग आणि कृषी क्षेत्रातील स्‍टार्टअपला प्रोत्‍साहन दिले असून कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच सेंद्रीय शेतीलाही आपल्‍याला पुढे घेवून जावे लागेल. जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यानेच आज उत्पादन क्षमता वाढत आहे.
राज्‍यशासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना फळांसाठीदेखील लागू केली असून, याचा मोठा लाभ हा डाळींब उत्‍पादक शेतकऱ्यांनाही झाला आहे. राज्‍यशासन कोणतीही योजना बंद करणार नाही, लाडक्‍या बहिणींप्रमाणेच शेतकऱ्यांनाही विमा योजनेचा लाभ देण्‍यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलीक, बाबासाहेब गोरे यांचीही भाषणे झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील कृषी औजारे व साहित्याच्या स्टॉलना भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *