
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन “ऐ मेरे वतन के लोगो” हे गीत सर्वत्र ऐकव्यास मिळते लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झाले त्या युद्धात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते त्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 जानेवारी 1963 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते. कवी प्रदीप यांनी लिहिलेले हे गीत लता मंगेशकर यांनी गायले. या गीताला सी. रामचंद्र यांनी सुमधुर असे संगीत दिले व हे देशभक्तीपर गीत ऐकून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी उपस्थित सर्वच भावूक झाले होते. आज इतक्या वर्षानंतरही कधीही हे गीत ऐकल्यानंतर अंगावरती काटा उभा राहतो. या गीताचे शब्द, स्वर व संगीत हृदयाला स्पर्श करते. हे लाईव्ह प्रोग्राममधील गीत अजरामर झाले आहे.
संगीतकार रामचंद्र नरहरी चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथे 22 जानेवारी 1918 रोजी झाला. सी. रामचंद्र यांचे बालपण पुणतांबा गावातच गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड असल्याने ते सुर पेटी वाजवत असे. ती सुर पेटी आजही पुणतांबा गावातील त्यांच्या अडीचशे वर्ष जुना असलेल्या वाड्यात असून त्यांचे पुतणे प्रभाकर चितळकर वय वर्ष 95 ह्यांनी त्या सुर पेटीला दुरुस्त करून घेतले. आपल्या काकांची त्यांना आठवण आल्यास अगदी मायेने सी. रामचंद्र यांच्या हाताचा स्पर्श झालेल्या त्या सुर पेटीवर हळुवारपणे सुर छेडत असतात.
रामचंद्र यांचे वडिल रेल्वे कर्मचारी होते त्यांनी रामचंद्र मधील संगीताची आवड ओळखून त्यांना संगीताचे शिक्षण घेण्यासाठी नागपूरला पाठवले होते तेथून ते तयार होवून नशीब अजमवण्यासाठी मुंबईला गेले. ऐन तारुण्यात प्रवेश केलेले संगीताचे शिक्षण घेतलेले सी. रामचंद्र मात्र संगीत सोडून चित्रपट सृष्टीत हिरो बनण्याची स्वप्न पाहू लागले. 1935 मध्ये त्यांनी नागानंद तसेच शादी आणि आत्मा तरंग या चित्रपटात प्रमुख भूमिका केली परंतु ते चित्रपट चाललेच नाही म्हणून त्यांनी हिरो बनण्याचा नाद सोडला. 1942 मध्ये “सुखी जीवन” या चित्रपटातील गीतांना सी. रामचंद्र यांनी संगीत दिले व खऱ्या अर्थाने तेथूनच सुरू झाला सी. रामचंद्र यांचा संगीतकार म्हणून प्रवास. सन1947 ला शहनाई 1949 ला पतंगा 1951 ला अलबेला 1953 ला अनारकली या सर्व चित्रपटातील गाण्यांना सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले होते. अनारकली चित्रपटात एकुण तेरा गाणे होते. त्याकाळी ही गाणी खूप गाजली. सर्व चित्रपट सृष्टीत सी. रामचंद्र यांचे नाव झाले. त्यांना सर्वजण आदराने “अण्णा” म्हणू लागले ते संगीता बरोबरच अभिनय व गायनातही हुशार होते. त्यांनी चित्रपट सृष्टीत अण्णासाहेब, राम चितळकर, आर.एन. चितळकर आणि श्यामू अशा विविध टोपण नावांचा वापर केला. सतत नाव बदलण्याचे कारण त्यावेळी मराठी माणसांची होणारी अडवणूक हे ही असू शकते परंतु सी.रामचंद्र हे नाव त्यांना योग्य वाटल्याने त्यांनी शेवटपर्यंत त्याच नावाचा वापर केला त्यांनी मराठी, तेलगू, तमिळ आणि भोजपुरी चित्रपटासाठीही संगीत दिले .त्यांनी न्यू साई प्रोडक्शन च्या बॅनरखाली झांजर (1953 ) लहरे (1953) दुनिया गोल है (1955 ) हे तीन हिंदी चित्रपट आणि धनंजय (1966 ) व घरकुल (1970 )या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली.सी. रामचंद्र यांनी एकूण 106 चित्रपटांना संगीत दिले त्यातील बरीचशी गाणी लता मंगेशकर बरोबर सी. रामचंद्र यांनीही गायलेली आहेत ती गाणी “कितने हसीना है मौसम कितना हसीन सफर है” ( चित्रपट -आझाद गायक लता मंगेशकर व सी. रामचंद्र ) “भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे” ( चित्रपट- अलबेला गायक लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र) ” शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो” (चित्रपट -अलबेला गायक लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र ) “शोला जो भडके दिल मेरा धडके”( चित्रपट- अलबेला गायक लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र) औ हमसे चुप है हम उनसे चुप है (चित्रपट- सरगम गायक लता मंगेशकर आणि सी रामचंद्र) आजही हि गाणी लोकप्रिय असून गुणगुणायला व डोलायला लावतात.
सी. रामचंद्र यांचा जन्म पुणतांबा येथील त्यांच्या जुन्या वाड्यात झालेला असून बालपणही पुणतांबा येथेच गेलेले आहे. मात्र जन्मभूमीतील अनेक ग्रामस्थांना कोण सी. रामचंद्र हेच माहीत नाही. मी जेव्हा पुणतांबा गावात गेलो तेव्हा लवकर त्यांचे घर ही सापडेना. काही लोकांना विचारले तर माहीत नाही म्हणून सांगत होते. सामाजिक, राजकीय चळवळीत नेहमी अग्रेसर असणारे पुणतांबा या गावात सी रामचंद्र यांचा कुठेही स्मृती स्तंभ नाही , कुठल्या रस्त्याला नाव ही दिलेले नाही किंवा साधा बोर्ड ही लावलेला नाही. देश परदेशात पुणतांबा गावाचे नावलौकिक वाढवणारे सी. रामचंद्र यांचे स्मारकासाठी ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ यांनी शासनाकडे मागणी केली पाहिजे अशी सी. रामचंद्र यांचे नातू शंकर चितळकर यांची अपेक्षा आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतील अशा या महान संगीतकाराचे मुंबईत 5 जानेवारी 1982 ला निधन झाले ते वास्तव्यास असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मुंबईकरांनी मात्र त्यांचा आकर्षक असा भव्य स्मृती स्तंभ बांधलेला आहे. कर्मभूमीतील मुंबईकर सी.रामचंद्र यांना विसरले नाहीत परंतु जन्मभूमी असलेले पुणतांबेकर मात्र सी. रामचंद्र यांना विसरले असेच म्हणावे लागेल. पुणतांब्यात सी. रामचंद्र यांचे स्मारक झाल्यावर त्यांचा संगीत व चित्रपट क्षेत्रातील प्रवास समोर येऊन तो तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्श ठरेल असे वाटते.
अरुण खरात
चांदेकसारे, कोपरगाव
मो. 9960838433
