के.जे.सोमैया महाविद्यालयाचे 1971 चे 71 विद्यार्थी 54 वर्षांनी पुन्हा एकत्र…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“गेल्या काही वर्षांमध्ये सोमैया महाविद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. महाविद्यालयाची ही प्रगती व बदललेले स्वरूप पाहून आम्ही खरोखर हरखून गेलो आहोत. त्यामुळे या वयात देखील महाविद्यालयात पुन्हा- पुन्हा यावेसे वाटते आहे. मी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आश्वासन देतो की, आम्ही पुन्हा लवकरच एकत्र येऊ. अखिल महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा काका कोयटे यांनी या भावना व्यक्त केल्या. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की महाविद्यालयाने नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच आज सात विषयांच्या संशोधन केंद्रात तब्बल 200 संशोधक विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. यापुढेही या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा ही व्यक्त करतो.”
स्थानिक के. जे सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे सन 1968-69 ते 1971-72 चे विद्यार्थी तब्बल 54 वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने महाविद्यालयात एकत्र आलेत.
सोमैया महाविद्यालय व समता पतसंस्थेचे संस्थापक मा. काका कोयटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सुवर्ण योग घडवून आणला.
या स्नेहमेळाव्यात महाविद्यालयाचे तत्कालीन प्राध्यापक डॉ. सुधाकर गणोरकर, प्रा.अविनाश घैसास, प्रा. एन एम जोशी या वयोवृद्ध प्राध्यापकांचा उपरोक्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ह्रद्य सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात माजी विद्यार्थी मा. काका कोयटे, एन. एम. क्षीरसागर, आश्विनकुमार व्यास, कोटस्थाने मॅडम व सुधीर डागा यांनीही माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून मनोगते व्यक्त केलीत.
मेळाव्याच्या प्रारंभी महाविद्यालयाची आजी विद्यार्थिनी दिपाली जाधव हिने ‘भरतनाट्यम’ नृत्याद्वारे गणेश वंदना सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
यानंतर महाविद्यालयाचे सर्व दिवंगत माजी प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे आगमन झाल्यानंतर सर्वांचे औक्षण करून महाविद्यालयाचा गोदातरंग वार्षिकांक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच महाविद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना महाविद्यालयाने गेल्या काही वर्षात केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचा आलेख प्रस्तुत करीत सध्या महाविद्यालयात असलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती देखील सादर केली.
या मेळाव्या दरम्यान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नेत्रदीपक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुप्रिया गायकवाड, प्रियंका जोगदंड व सार्थक वायकर यांनी बहारदार गवळण सादर केली तर भारती वैरागळ हिने दिलखेचक लावणी सादर करून उपस्थितांना घायाळ केले. मेघा सोनवणे मानसी उपाध्याय, प्राची परदेशी व पलक मोरे यांनी अत्यंत सुंदर घूमर नृत्य सादर केले. तर ‘देश रंगीला’ या देशभक्तीपर नृत्यगीताने सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली. आजी विद्यार्थ्यांच्या या कलाप्रकारांना उपस्थित आजी-माजी विद्यार्थ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने उस्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मा. सौ. शोभाताई रोहमारे यांनी रुपये 51000/-, सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी रुपये 51000/-, सुधीर गवांदे 11,111/-, सुधीर डागा 11,111/-, प्रा सुधाकर गणोरकर 11,000/- ,नरेंद्र बागुल 21,000/-, आशुतोष पटवर्धन 21,000/-, शब्बीर पठाण 11,000/-, काका कोयटे 11,000/- व इतर सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 21,000/- तर या आधीच्या मेळाव्यात आश्विन कुमार व्यास यांनी 11,111/- इतकी वर्गणी महाविद्यालयास देऊन महाविद्यालयाच्या ऋणामध्ये रहाणे पसंत केले. या संपूर्ण मेळाव्याचे सूत्रसंचालन व समन्वय, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी तर प्रा वर्षा आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *