
कोपरगाव प्रतिनिधी
(कर्जत):- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.
मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. प्रशासनाच्या सर्व विभागांच्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा व कामकाजाची पाहणी करून निवडणूक आचारसंहितेच्यादृष्टीने त्यांनी सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक श्री.ओला यांनी ईव्हीएम सुरक्षिततेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली.
याप्रसंगी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील, कर्जतचे तहसीलदार गुरू बिराजदार, जामखेडचे तहसीलदार गणेश माळी, कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुळीक, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, खर्डाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, कर्जत नगरपंचायत मुख्याधिकारी अक्षय जायभाये, जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे, नायब तहसीलदार प्रीतम ठोंबरे, निवडणुक नायब तहसीलदार योगेश जाधव आदी उपस्थित होते.
