
कोपरगाव प्रतिनीधी:- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी ६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जलअभिषेक, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, ३५० मशालींसह महाआरती आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात प्रथमच भव्यदिव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर अवघ्या भारताचा मानबिंदू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पानच होय. शिवराज्याभिषेक हा केवळ महाराष्ट्रच नाही, भारत देशच नाही तर अवघ्या जगासाठी आनंदाचा दिवस आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतींच्या उदात्त व लोककल्याणकारी कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे, या उद्देशाने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरात पहिल्यांदाच मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी ६ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जलअभिषेक करण्यात येणार आहे. अलकनंदा (बद्रीनाथ), धौलगिरी (विष्णू प्रयाग), भागीरथी (उत्तराखंड), गंगा, यमुना, सरस्वती (प्रयागराज, उत्तर प्रदेश), पंचगंगा (हरिद्वार, उत्तर प्रदेश), मंदाकिनी (केदारनाथ) तसेच गोदावरी या पवित्र नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे. तद्नंतर ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून मानवंदना देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व तेजोमयी कार्य तरुण पिढीला माहीत व्हावे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगावात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले असून, शिवभक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांनी केले आहे.
