

कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा शुक्रवार दि. 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली. याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री मधुकर साबळे उपाध्यक्ष श्री सुनील बोराडेप बाबासाहेब कर्डिले अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही. सी. ठाणगे, मेळावा- समन्वयक डॉ. एस. एल. अरगडे उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. यादव म्हणाले की “के. जे. सोमैया महाविद्यालय हे कोपरगाव तालुक्यातील उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाने मागील दोन दशकात विद्यार्थ्यांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून अनेक सुविधा व अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या सर्व बाबी पालकांनी स्वतः बघाव्यात आणि आपल्या पाल्याला अध्ययनात काही अडचणी येत असल्यास त्या आमच्यासमोर मांडाव्यात त्यामुळे त्यातून मार्ग काढून आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या दूर करण्यात येतील, असा या मेळाव्याचा उद्देश आहे.”
याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. मधुकर साबळे सविस्तर माहिती देताना म्हणाले की “गेल्या दोन-तीन वर्षात कोविड 19 च्या परिस्थितीमुळे पालक मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाला होता. त्यामुळे अनेक पालकांना आरोग्य आणि इतर कारणांनी सहभाग नोंदविता आला नव्हता. मागील वर्षापासून मेळावा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने घेतला जात आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या पाल्याला येणाऱ्या अडचणी व त्यांचे भवितव्य याविषयी प्राचार्य, प्राध्यापक व संस्थाचालक यांच्याशी संवाद साधावा, त्यामुळे त्यातून सार्थक बाबी घडून येतील.”
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की “नॅक या राष्ट्रीय संस्थेने आमच्या संस्थेच्या के. जे. सोमैया महाविद्यालयाला सलग दोन वेळा ‘अ’ श्रेणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालय तसेच इतर संस्थांनी देखील विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. अशा शैक्षणिक संस्थेत आपला पाल्य शिक्षण घेत आहे ही आमच्या दृष्टीने देखील गौरवाची बाब आहे. मात्र त्याला अधिकाधिक सोयी सुविधा पुरवून रोजगाराभिमुख शिक्षण द्यावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये त्याला काही अडचणी येत असतील तर पालकांनी त्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात जेणेकरून त्यातून योग्य मार्ग काढून त्यावर मात करता येईल हेच या पालक मेळाव्याचे मुख्य प्रयोजन आहे.”
तरी या पालक मेळाव्यास बहुसंख्य पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव एड्. संजीव कुलकर्णी व विश्वस्त श्री. संदीप रोहमारे यांनी केले आहे.
