महिला गाव विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय झाल्या तर विकासाला गती मिळेल:- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- महिला ज्याप्रमाणे घर स्वच्छ ठेवतात. त्यामुळे घर आणि परिसरातील वातावरण प्रफुल्लीत होते. त्याप्रमाणे महिला जर गाव विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय झाल्या तर गावाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा अधिक वेगाने विकास होईल, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सरपंच चंद्रकांत चांदर, उपसरपंच नीलेश वराडे, ग्रामसेविका जयश्री शेलार, जि. प. शाळेच्या श्रीमती पवार, नंदा रोहम, साधना वराडे, सरला चांदर, रूपाली आहेर, भारती खंडीझोड, अनिता गोधडे, मनीषा बर्डे,अनिता चांदर, सुनीता काळे, अर्चना गोसावी यांच्यासह सप्तशृंगी, बालाजी, स्वामी समर्थ, शिवनेरी, आदिशक्ती, भीमाशंकर, पंचशील, वैष्णवी, भाग्यश्री, दीक्षा, महालक्ष्मी, मातृछाया, तुळजा भवानी आदी महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्य तसेच खिर्डी गणेश व पंचक्रोशीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकार जनतेच्या हितासाठी, महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या या विविध योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा. सरकारने बेघर लोकांसाठी घरकुल बांधून देण्यासाठी महाआवास योजना सुरू केलेली आहे. महाआवास योजनेअंतर्गत प्रलंबित घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच घरकुलचे काम शंभर दिवसांत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐतिहासिक संप पुकारून मोठे आंदोलन केले. हा उठाव यशस्वी झाला आणि महिलांना न्याय्य हक्क दिला गेला. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. महिला बचत गट हा माझ्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण, माझी सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात महिला बचत गट चळवळीतून झाली. १५-२० वर्षांपूर्वी मी महिला बचत गटाचे काम सुरू केले होते तेव्हा ग्रामीण भागातील महिलेला वाटायचे की, मी बचत गटात भरलेले ५०-१०० रुपये वाया जातील का? मी बँकेत वेगळे खाते उघडलेले, मी बचत गटात पैसे भरलेले माझ्या घरच्या लोकांना आवडेल का? अशी भीती महिलांना वाटत होती. त्यांच्या मनातील ही भीती मी दूर केली. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सहा महिन्यांपर्यंत चांगली बचत केली आणि तो गट कर्जाला पात्र झाला. एका वेळी महिलांच्या हातात मोठी रक्कम आली तेव्हा त्यांनी आपल्या घरात सांगितले की, महिला बचत गटाद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून माझ्याकडे पाच हजार रुपये आले. हे ऐकून त्यांच्या घरच्या लोकांना खूप आनंद झाला. बँकेला कुठलीही कागदपत्रे न देता, काहीही गहाण न ठेवता एकाच वेळी एवढी मोठी रक्कम मिळाली, याचा त्यांना आनंद झाला. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांचा या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हे सर्व बदल मी जवळून पाहिले आहेत.


महिला बचत गटांमुळे महिलांच्या जीवनात मोठी क्रांती झाली आहे. महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांची त्यांच्या घरातील पत वाढली. समाजातील पत वाढली. आज अशी परिस्थिती आहे की, महिला बचत गटाला बँकेकडून कर्ज घेण्याची गरज नाही. त्यांची स्वत:ची ठेव इतकी झाली आहे की, या ठेवीतून त्या एकमेकींना मदत करत असतात. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, दवाखान्याचा खर्च व घरातील इतर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महिला बचत गटांचा फार मोठा हातभार लागला आहे. मी सुद्धा एका बचत गटाची सदस्य आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. महिला बचत गटाचे काम करणे हे पुण्याचे काम आहे. मी बचत गटात काम करता-करता कधी आमदार होऊन विधिमंडळात गेले हे समजले नाही. चांगल्या कर्माची देव नोंद ठेवत असतो. चांगले काम केले तर त्याचा नक्कीच फायदा होत असतो याचा मला अनुभव आला. संजीवनी महिला स्वयं अर्थसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन महिलांचे बचत गट स्थापन करून ही चळवळ वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले. अनेक गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मदत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. आज अनेक महिला बचत गट सक्षम झाले आहेत. महिला बचत गटामुळे आज महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, त्या स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. आपण एकटे पुढे जाण्यापेक्षा आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्यांनाही प्रगतीकडे नेण्याचे काम केले पाहिजे. त्यातच खरे समाधान आहे, असे त्या म्हणाल्या.
स्त्री ही आदिशक्ती समजली जाते. आज एकविसाव्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करून वर्चस्व गाजवत आहेत क्रांतिजोती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांपासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.. प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. महिलांच्या वाट्याला तर खूप संघर्ष येत असतो; पण त्यामुळे घाबरून न जाता संकटांवर मात करून महिलांनी पुढे मार्गक्रमण करावे व आपली प्रगती साधावी, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *