
कोळपेवाडी वार्ताहर:- बचत गटाच्या महिलांना घरबसल्या छोटे-मोठे उद्योग सुरु करण्याची प्रेरणा देवून त्यांनी उत्पादित झालेल्या तयार मालाला हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देवून या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोनच दिवसात या गोदाकाठ महोत्सवात जवळपास ४० लाखाची उलाढाल झाली आहे.
शुक्रवार (दि.६) पासून सुरु झालेल्या या गोदाकाठ महोत्सवामध्ये कोपरगाव शहर व तालुक्यातील बचतगटांच्या महिलांचे विविध प्रकारच्या तयार मालांचे एकूण २६७ स्टॅाल्स लावण्यात आले आहेत. गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी बचतगटांच्या महिलांना अतिशय अल्प दरात ना नफा ना तोटा या धर्तीवर स्टॅाल्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ज्या प्रमाणे बचत गटाच्या महिला दोन वर्षापासून या गोदाकाठ महोत्सवाची वाट पाहत होते त्याप्रमाणे नागरिक देखील गोदाकाठ महोत्सवाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरु झालेल्या गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या तयार मालाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे दोनच दिवसात ४० लाखाची उलाढाल झाली आहे.

गोदाकाठ महोत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा आस्वाद घेवून नागरिक मंत्रमुग्ध होत आहे. उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना सेल्फी काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पुस्तकाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या संकल्पनेवर आधारित करण्यात आलेली विशेष सजावट गोदाकाठ महोत्सवाला भेट देणा-या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. खरेदीसाठी प्रत्येक स्टॉल्सवर होत असेलेली गर्दी व दोन दिवसात मिळालेला प्रतिसाद पाहता उर्वरित दोन दिवस देखील गर्दीचा उंच्चांक होणार आहे.
यावर्षी गोदाकाठ महोत्सवात कोपरगाव मतदारसंघातील सर्व धर्मांचे धर्मगुरु, विविध सामाजिक व धार्मिक ट्रस्टचे विश्वस्त, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रगतीशील शेतकरी यांचा गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्व धर्मांचे धर्मगुरु, मंदिरे व प्रार्थनास्थळांचे विश्वस्त, स्वामी समर्थ केंद्र, स्वाध्याय परिवार, जय जनार्दन भक्त मंडळाचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रगतीशील शेतकरी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर करखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध महिला मंडळाच्या सदस्या, शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आदी उपस्थित होते.
