
अहमदनगर शहरात मंगळवारपासून ७० वी राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धा…
कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर):- अहमदनगर शहरात ७० वी राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धा प्रथमच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर मॅटवर होत आहे. राज्यातील नामवंत कबड्डी खेळाडू सहभागी होणार आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर घालणारी ही स्पर्धा आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.

अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेद्वारा आयोजित ७० वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मंगळवार, २७ डिसेंबर पासून वाडिया पार्क मैदानावर सुरू होत आहे. राज्य कबड्डी असोसिएशनची या स्पर्धांना मान्यता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ५२ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या मॅट घेण्यात आल्या असून, कबड्डीच्या इतिहासात प्रथमच राज्य स्पर्धा मॅटवर होणार आहेत. पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, सहसचिव विजयसिंह मिस्कीन, उपाध्यक्ष जयंत वाघ, खजिनदार प्रकाश बोरूडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने मोठ्या प्रयत्नाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर कबड्डी सामने पाहण्याची संधी अहमदनगरकरांना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर पडणार आहे.
यावेळी पालकमंत्र्यांनी मैदानाची पाहणी करून स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कबड्डी संघटनेचे कौतुक केले. कैलास पठारे, सुधाकर सुंबे, शंतनू पांडव, पोपट कड्डस आदी उपस्थित होते.
