पश्चिम घाटमाथ्यावरचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून सिंचनाची तूट भरून काढावी:- राजेशजी परजणे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटमाथ्यावर ( कोकणात) पडणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्न सोडविण्याबाबत माजी केंद्रीय मंत्री पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र पाणी परिषदेने गेल्या २० ते २२ वर्षापूर्वी राज्य सरकारकडे पाठविलेला प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून भविष्यातील पाण्याचे भिषण संकट विचारात घेवून या प्रश्नात आपण जातीने लक्ष घालावे व तो मार्गी लावावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
माजी मंत्री पद्मभुषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र पाणी परिषदेची वाटचाल सन १९९२ पासून सुरु आहे. राज्याचा समतोल विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून ही पाणी परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नेते व माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांना सोबत घेवून महाराष्ट्रातील वर्तमान आणि भविष्यातील पाण्याच्या प्रश्नांबाबत सखोल अभ्यास करून राज्याला वरदान ठरणाऱ्या गोदावरी, तापीसह महाराष्ट्रातील इतर खोऱ्यातील पाण्याच्या उपाय योजना कमीत कमी खर्चात कशा पध्दतीने करता येऊ शकतील याबाबत अभ्यासपूर्ण असा प्रस्ताव पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांनी तयार करून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना सादर केला होता. पश्चिम घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी एक बोगदा तयार करण्याची गरज आहे. तो देखील अतिशय कमी खर्चात तयार करता येऊ शकतो असा तो प्रस्ताव होता. त्यावर अभ्यास करुन तिघाही मुख्यमंत्री महोदयांनी पाणी परिषदेच्या या प्रस्तावाची दखल घेवून तातडीने उपाय योजना करण्याचे सूतोवाच केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संबंधित अधिकारी वर्गाला कार्यवाहीबाबत सूचना दिल्या होत्या परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आघाडी सरकारकडेही मी यासंदर्भात निवेदन पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मागणी केलेली होती त्यावरही विचार झालेला नाही.
महाराष्ट्र राज्यात गेल्या ६० ते ६५ वर्षाच्या प्रयत्नानंतर देखील पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र टँकरमुक्त होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वीच्या सरकारकडे अनेकदा निवेदने पाठवून हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी केलेली होती. राज्यातील कृष्णा खोऱ्याचे नियोजन केले जाते मग गोदावरी आणि तापी खोऱ्यांतील पाण्याचे नियोजन करताना यापूर्वीच्या सरकारने उदासिनता का दाखविली हा प्रश्न आहे. राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यातच नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद शहरातील लोकसंख्या दिवसांगणिक वाढत चालल्याने या शहरांना पाण्याची गरजही भरमसाठ प्रमाणात भासत आहे. परिणामी गोदावरी खोऱ्यात सद्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झालेली असल्याने शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. पाण्याअभावी शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतीला पुरक असलेला दुग्ध व्यवसाय देखील मोडकळीस आलेला आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभिर बनलेला आहे. ऐन पावसाळ्यात खेडोपाडी पाण्याचे टँकर सुरु करण्याची वेळ आलेली आहे. हा प्रश्न दहा पंधरा वर्षापूर्वीच सुटला असता तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना या अवर्षणप्रवण जिल्हयातील पाण्याचे संकट कायमस्वरूपी दूर झाले असते.
गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पश्चिम घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यामध्ये वळवून पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आपण जातीने लक्ष घालावे अशीही मागणी श्री परजणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *