के.जे.सोमैया महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
80 च्या दशकातील महाविद्यालय आणि आजचे सोमैया महाविद्यालय यात मोठा सकारात्मक बदल झालेला आहे. लागोपाठ दोनदा ‘नॅक’ या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने दिलेले ‘अ’ मानांकन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाल्याचे ऐकून खूप आनंद वाटला आणि आपण सोमैया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचाही अभिमान वाटला. याच महाविद्यालयात शिकून मी गेली 47 वर्षे एसबीआय तसेच इतर सहकारी बँकांमध्ये उच्च पदावर नोकरी करत आहे, याचे सर्व श्रेय या महाविद्यालयाला आहे, असे प्रतिपादन के. जे. सोमैया महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मा. बापूसाहेब घेमूड यांनी येथे केले.ते येथील के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीपराव रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. घेमूड पुढे म्हणाले की, मा. प्राचार्य साहेबांसोबत झालेल्या चर्चेतून समजले की आज सोमैया महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम, सात विषयांची संशोधन केंद्रे सुरू आहेत ही आम्हा माजी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूपच आनंदाची आणि विस्मयकारक बाब आहे. महाविद्यालयाची ही नेत्रदीपक प्रगती बघून अभिमान वाटतो.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना माजी विद्यार्थी संघाचे सचिव नितीन डोंगरे म्हणाले की, “कोपरगाव तालुका आणि परिसरात समाजाशी नाळ जोडलेले सोमैया महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. आजच्या या मेळाव्याने आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत. या महाविद्यालयाने अनेक मोठमोठे उद्योजक, अभियंता, कंत्राटदार, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक आदी नोकरदार तसेच समाजकारणी व राजकारणी देखील घडविले आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. आज महाविद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केली आहे, तरी देखील महाविद्यालयाची वास्तू आता जुनी झाली आहे. महाविद्यालयातचे कार्यक्षेत्र आता वाढलेले आहे. त्यामुळे महाविद्यालयावर आर्थिक बोजा देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत आपण माजी विद्यार्थ्यांनी मिळून महाविद्यालयासाठी किंवा किमान इथे शिकणाऱ्या गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन या महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करू असे मला मनोमन वाटते.”
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी गेल्या आठ-दहा वर्षातील महाविद्यालयाच्या नेत्रदीपक प्रगतीचा आढावा घेतला, तसेच महाविद्यालयात नव्याने सुरु झालेली संशोधन केंद्रे, शॉर्ट टर्म कोर्सेस,प्लेसमेंट सेल आदी संदर्भात विस्तृत माहिती अण्णा देताना विद्यार्थ्यांनी उत्तम नोकरी अथवा व्यवसाय करावयाचा असल्यास भविष्यात कोपरगाव सोडून लांब जाण्याची मानसिकता तयार करण्याचा सल्लाही उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या वतीने व्यास सर, नानासाहेब गव्हाणे, अनुप गिरमे, सुधीर डागा, प्रा डॉ लहू गायकवाड, सारिका पाठक, ऍड. राजाराम लोहकरे, उद्योजक पंकज लोढा, निकेतन आढाव, प्राचार्य अनिता थोरात, आदिनाथ ढाकणे, पंकज शिंदे, इरफान पठाण, उमेश जपे (उपसभापती, पंचायत समिती राहाता) अनील गिते, विलास बगाटे, रामदास गव्हाणे, प्रा. अनिल मते, अमोल चिने, प्रा डॉ दादासाहेब डांगे, सविता परदेशी, किरण पवार, संभाजी नाईक, महेंद्र घारे, विक्रम शिंदे आदी अनेक माजी विद्यार्थ्यांची मनोगते झालीत. त्यापैकी व्यास सरांनी 11111/-, अनुप गिरमे यांनी 21000/-रुपये, पंकज लोढा यांनी 51000/- रुपये, उमेश जपे यांनी 11000/- रुपये, ऍड. राजाराम लोहकरे यांनी विविध शासकीय तसेच निमशासकीय एजन्सीच्या माध्यमातून मोठा फंड मिळवून देण्याची ग्वाही देखील दिली.
मेळाव्याला 250 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. मनीष कोठारी,अशोकराव जमदाडे (सरपंच सावळीविहीर),एस. पी. कुलकर्णी (माजी मॅनेजर नगर अर्बन बँक), मोहनराव कोते (साईबाबा मंदिर प्रमुख, शिर्डी), दिलीप श्रीराम डागा (सचिव, महाराष्ट्र राज्य माहेश्वरी समाज संघ), दिलीप अरगडे (शिवसेना, उपजिल्हाप्रमुख), राजू रक्ताटे (वारकरी संप्रदाय नगर जिल्हा प्रमुख) आदींची विशेष उपस्थिती होती.याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहन यादव यांना विज्ञान विषयातील पेटंट प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मेळाव्याची सुरुवात माजी विद्यार्थी संघाच्या लोगोचे अनावरण तसेच स्वरांजली या ऍक्टिव्ह व्हॉइस ग्रुपच्या (अनिल गिड्डे,कु. लावर, कु. गोरे, शेंदुर्णीकर, बर्डे प्रा. निळेकर व सहकारी) संगीताच्या मेजवानीने झाली. तर विनायक रक्ताटे या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्याच्या मिश्कील भाषणाने मेळाव्याची सांगता झाली. गोदावरी संघाचे माजी मॅनेजर मातेरे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. डॉ. जिभाऊ मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *