
कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा – देवळाली प्रवरा हद्दीत भव्य क्रीडा संकुल उभारण्याची गरज असल्याचे व त्यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केले.
क्रीडा संकुल उभारणीसाठी शासन निधी देत असताना व नगरपालिकेच्या एकूण वार्षिक अर्थसंकल्पाच्या दोन टक्के निधी क्रीडा वर खर्च करण्याची तरतूद असताना सुद्धा देवळाली प्रवरा नगरपालिका क्रीडा संकुल उभारणी साठी प्रयत्न करीत नसल्याची खंत आप्पासाहेब ढुस यांनी बोलून दाखविली.
देवळाली प्रवरा येथे एकलव्य क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, डॉ तनपुरे कारखान्याचे व्हा चेअरमन दत्तात्रय ढुस, संदीप भांड, अजित कदम, संदीप कदम, एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गिताराम बर्डे, शहर अध्यक्ष नाना बर्डे, पप्पू बर्डे आदींसह संघटनेचे शेकडो सदस्य पत्रकार व खेळाडू उपस्थित होते.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, परिसरातील तरुणांची क्रीडा विषयक गरज व नगरपालिकेचा त्याबद्दल असलेला अनुस्थाह लक्ष्यात घेऊन देवळाली प्रवरा हद्दीत भव्य असे क्रीडा संकुल होणेसाठी आपल्या सर्वांना सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत, या स्पर्धा भरविणे साठी जी दानशूर मंडळी पुढे आली त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो, अश्या मंडळी मुळेच खेळाडू घडतात, खेळाडूंनी या ठिकाणी फक्त पाहिले बक्षीस प्राप्त करण्यासाठी खेळू नका तर देशाच्या टीम मध्ये सहभाग नोंदवून देशाचे नाव उज्वल करण्याचे लक्ष्य साध्य करा असा संदेश ढुस यांनी सर्व खेळाडूंना देऊन या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सुरेंद्र थोरात म्हणाले की, सर्व खेळाडूंनी संघ भावनेने खेळावे, तसेच या स्पर्धा भरविणेसाठी ग्राम सुधारणा मंडळाने जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आसारामभाऊ ढुस व सचिव मुरलीधर कदम यांचे आभार व्यक्त केले. व दत्तात्रय ढुस यांनी त्यांच्या भाषणातून सर्व खेळाडूंना संघ भावनेने खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुरेंद्र थोरात व दत्तात्रय ढुस यांनी टॉस करून विजेत्या संघाला खेळाला निमंत्रण देत उदघाटन प्रसंगी आप्पासाहेब ढुस यांनी गोलंदाजी केली तर सुरेंद्र थोरात यांनी फलंदाजी करून स्पर्धेची सुरुवात केली.
