
कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्याचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्व.कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी त्यांनी कोल्हे कुटुंबातील स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे, मुलगा नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, डॉ.मिलिंद कोल्हे, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार,स्नुषा माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नातू अमित कोल्हे, विवेक कोल्हे,अमृता पवार यांची भेट घेतली.



यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व.शंकरराव कोल्हे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी देशात परत आल्यानंतर आयुष्यभर शेतकऱ्यांची वेशभूषा परिधान केली.त्यांनी मराठी मातीतील माणसासाठी लोककल्याणाची कामे केली. शेती क्षेत्रात त्यांनी संशोधनाला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना शेतीला दुधासोबत इतर पूरक व्यवसायाची जोड मिळवून दिली. राज्यातील राजकारणात त्यांना विशेष स्थान होत. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी सहकार व शेती क्षेत्राविषयी सतत मार्गदर्शन केले. पवार साहेबांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनाने सहकार महर्षी आणि सहकारातील संजीवनी हरपली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे त्यांनी सांगितले.
