कोपरगाव प्रतिनिधी:-
“विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड : इंटरकल्चरल कम्युनिकेशन व्हाया इंटरनॅशनल कोलॅबोरेशन प्रोजेक्ट हा प्रकल्प म्हणजे केवळ दोन उच्च शिक्षण संस्था अथवा विद्यापीठांतील शैक्षणिक संबंध सुरू ठेवण्यापुरता मर्यादित नाही, तर दोन देश आणि संस्कृतींना एकत्र आणण्यासाठीचा ठोस संबंध आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही देशातील संस्कृती व परंपरा विद्यार्थ्यांना समजली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी भविष्यात देखील एकत्र येऊन असे उपक्रम सुरू ठेवावेत” असे प्रतिपादन मलेशियातील मारा युनिव्हर्सिटीच्या केदाह केंद्राचे प्रोफेसर डॉ. हेमधी यांनी ऑनलाईन कार्यक्रमात केले. ते मलेशिया स्थित मारा विद्यापीठाच्या केदाह ब्रांच आणि के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड इंटरकल्चरल कम्युनिकेशन इंटरनॅशनल कोलॅबोरेशन प्रकल्पाच्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या ऑनलाईन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे हे होते.
प्रो. हेमदी पुढे म्हणाले की “जगात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर विविध देशांच्या संस्कृतींची ओळख करून घेणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या संस्कृतींची ओळख म्हणजेच खऱ्या अर्थाने माणसा- माणसाची ओळख होय, आणि त्यामाध्यमातून जवळ येणे होय. अशा कार्यक्रमांचे पुन्हा पुन्हा होणे गरजेचे आहे.”
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संदीप रोहमारे म्हणाले की “संस्कृती ही मानवी जीवनाचा अनिवार्य भाग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन देशांच्या संस्कृतींचे आदान-प्रदान झाले आणि या माध्यमातून संपूर्ण जग हे जणू काही एक गाव आहे हे सिद्ध झाले, ही जमेची बाजू आहे. असा कार्यक्रम घेणारे सोमैया महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याबद्दल मी व्यक्तिशः सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनापासून अभिनंदन करतो.” प्राचार्य डॉ बी एस यादव म्हणाले की “सोमैया महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी मलेशिया मधील अत्यंत प्रतिष्ठित यु. आय.टी.एम. मारा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी तीन महिने सतत संवाद प्रस्थापित केला व ऑनलाईन स्वरुपात आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्की होईल असा मला विश्वास वाटतो. भविष्यात मारा विद्यापीठाशी सामंजस्य करार करून त्या माध्यमातून अशाच स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येतील.”
कार्यक्रमाच्या शेवटी आय. क्यू. ए.सी.समन्वयक प्रा. विजय ठाणगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की “भविष्यात आम्ही मारा विद्यापीठाबरोबर सामंजस्य करणार असून याचा फायदा दोन्ही देशातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना होईल असा विश्वास मला वाटतो.
उपरोक्त कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रा. डॉ. रवींद्र जाधव व मारा विद्यापीठाच्या प्रा. सियाजलियाती इब्राहिम यांनी प्रास्ताविकात उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, 10 नोव्हेंबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या दरम्यान प्रस्तुत आंतरसंस्कृती आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मलेशियातील 163 व सोमैया महाविद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन 20 ऑनलाइन सत्रांमध्ये व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधला. कोविंड महामारी काळात या कार्यक्रमाकडे विद्यार्थ्यांनी संधी म्हणून बघितले. या कार्यक्रमात पर्यटन सण-उत्सव, चित्रपट,श्रद्धा आणि त्यामागील विज्ञान, नृत्य, संगीत, ड्रेसिंग पॅटर्न, विवाह शैली, भाषा व धर्म रचना, खाद्यसंस्कृती आदी अनेक विषयांचा समावेश होता. या समारंभातमध्ये दोन्ही देशातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर तसेच सांस्कृतिक नृत्य व गीते ऑनलाइन स्वरूपात सादर केलीत. तसेच कार्यक्रमाची सुरुवात भारत आणि मलेशिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रगाणाने झाली.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारा विद्यापीठाच्या शरीना साद मॅडम, प्रा. अझलान, रफीदाह मॅडम, बवानी मॅडम,नूर हिदियाती, नॉरलिझाती, ऐशा मॅडम, रूबेखा मॅडम, नूर असनी, साकिराह मॅडम, समसिहा मॅडम, नोर असला, प्रा.अझरूल व सोमैया महाविद्यालयाचे डॉ. संजय अरगडे, प्रा. बाळनाथ मोरे, प्रा. कोमल म्हस्के , प्रा. विजय खंडीझोड, डॉ. महारुद्र खोसे, प्रा.आकाश पवार, प्रा. निखील लोंढे,प्रा. वर्षा आहेर, प्रा. प्रशांत भदाणे तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सतत तीन महिने विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ:-
समारोप प्रसंगी बीजभाषण देतांना मलेशियातील मारा युनिव्हर्सिटीच्या केदाह केंद्राचे प्रोफेसर डॉ. हेमधी.
