कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला साईबाबांनी केलेली दीनदुबळ्यांची सेवा डोळ्यासमोर ठेऊन उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच बैठक घेवून पाहणी केली. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, शिर्डी येथील श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. यामध्ये बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. अशा रुग्णांना इतर मोठ्या दवाखान्यात उपचार घेणे शक्य नसते. त्यामुळे बहुतांश रुग्ण साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण आरोग्य सुविधेच्या बाबतीत समाधानी होणे गरजेचे आहे व या रुग्णांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्या यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या आहे. यावेळी हॉस्पिटलच्या अडचणी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी आ.आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व हॉस्पिटल प्रशासन कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करून घ्यावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

फोटो ओळ:- श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधाबाबत आढावा घेतांना अध्यक्ष आ.आशुतोष काळे.
