के. जे. सोमैया महाविद्यालयात हिंदी दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
” हिंदी स्वतंत्र भारताची राजभाषा, राष्ट्रभाषा व प्रमुख संपर्क भाषा आहे. हिंदी भाषेला हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. कविते बरोबरच हिंदी मध्ये शेकडो कालजयी रचना प्रसिद्ध आहेत. अशी ही हिंदी भाषा आज जगाची भाषा होऊ पाहाते आहे. त्यामुळे हिंदीचे सौंदर्य जपतानाच त्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होत आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी हिंदीचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करून आपापले भविष्य घडवावे.” असे प्रतिपादन विश्व हिंदी महासभेच्या सदस्य आणि कवयित्री मनीषा खटाटे यांनी केले. स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व आय. क्यु. ए. सी.विभागाच्या विद्यमाने “विश्व साहित्य के परिदृश में हिंदी साहित्य का योगदान एवं रोजगार के अवसर” या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष प्रासंगिक व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी को. ता. ए. सोसाटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे उपस्थित होते.
श्रीमती खटाटे यांनी हिंदी भाषेच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशावाद व्यक्त करतानाच आपल्या प्रासंगिक कवितांच्या सादरीकरणाद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवले.


याप्रसंगी विशेष वक्ता विश्व हिंदी महासभेचे संघटन महामंत्री मा. अमित रजक म्हणाले की, “आमची संस्था हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. हिंदी आणि विविध प्रांतीय भाषांमध्ये समन्वय साधून हिंदीला विश्वभाषा बनवण्यासाठी महासभा प्रयत्नशील आहे. आपले महाविद्यालय ग्रामीण भागातील एक चांगले महाविद्यालय असून हिंदी भाषेत पीएच. डी. पर्यंतच्या संशोधनाची सुविधा असल्याने हि आमच्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे.”
व्याख्यानसत्राच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे संस्था व महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करताना हिंदी भाषेचे महत्व विशद केले. आय. क्यु. ए. सी. विभागाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे यांनी व्याख्यान सत्राच्या आयोजनाबद्दल हिंदी विभागाचे कौतुक करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. बी. दवंगे यांनी केले. प्रा. डॉ. बी. एस. भुजाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. जे. एस.मोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *