गोदावरी कालव्यांना जास्तीत जास्त आवर्तन द्यावे आ. आशुतोष काळेंची पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- नाशिक धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सगळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. मात्र कोपरगाव मतदारसंघात सरासरी २४ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून गोदावरी कालव्यांना जास्तीत जास्त आवर्तन देण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे केली आहे.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.११) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आ. आशुतोष काळे यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिनार कुदळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर हे ऑनलाईन प्रणाली द्वारे उपस्थित होते.
यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार व्हा. चेअरमन दिनार कुदळे यांनी कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांची पाणी पट्टी पूर्णपणे माफ करण्याची आ. आशुतोष काळे यांच्या वतीने मागणी केली. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीचा विचार न करता खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहे. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने खरीपाची पिके धोक्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या कोपरगाव तालुक्यातील एकाही गावात टँकर सुरु नाही परंतु परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही तर पाण्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. गोदावरी कालव्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी दोन दोन आवर्तने दिले जातात. मात्र टंचाईची परिस्थिती पाहता गोदावरी कालव्यांना जास्तीच्या आवर्तनाची गरज भासणार आहे. याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
तसेच काकडी, मल्हारवाडी, रांजणगाव देशमुख, तिळवणी, शिरसगाव- सावळगाव, मोर्वीस, अंजनापूर व उक्कडगाव या गावांची सद्यस्थितीत पाणी परिस्थिती समाधानकारक असली तरी भविष्यात पाणी टंचाई मोठ्याप्रमाणावर जाणवणार आहे. त्या दृष्टीने या गावांतील पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी विहीर दुरुस्ती, खोलीकरण व नवीन कुपनलीकांसाठी निधी द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळेंच्या वतीने दिनार कुदळे यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
तसेच पालखेड डाव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या सर्व गावातील बंधारे आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या आ. आशुतोष काळे यांच्या मागणी नुसार सर्व बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिले होते. परंतु पावसाचा पडलेला खंड व वाढलेली उष्णता यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून हे पाझर तलाव व बंधारे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरून द्यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्या वतीने व्हा. चेअरमन दिनार कुदळे यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
