संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची शहरातून दिंडी; कोपरगावकरांना घडवले पंढरपूर वारीचे दर्शन…


जयघोष, फुगडी आणि लेझिमच्या तालावर बालवारकरी दंग सामाजिक जनजागृतीपर संदेशांनी वेधले शहरवासीयांचे लक्ष…
कोपरगाव प्रतिनिधी:-
वारकरी पोशाख, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात उंच डोलणाऱ्या भगव्या पताका, टाळांचा गजर आणि लेझिमच्या निनादात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव शहरातून विठ्ठल-नामाचा जयघोष करत भव्य आषाढी दिंडी काढली. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी संपूर्ण कोपरगावकरांना पंढरपूरच्या वारीची प्रत्यक्ष अनुभूती घडवून आणली. वारीच्या भक्ती रंगात रंगण्यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर फलक हाती घेऊन शहरात मोठी जनजागृतीही केली.
सामाजिक संदेशांनी वेधले लक्ष
‘हरी आणि वारी’ हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आषाढी वारीची हीच परंपरा आणि संस्कृती शालेय विद्यार्थ्यांना अनुभवता यावी, यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दिनांक २४ जून २०२६ रोजी या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
केवळ धार्मिकताच नव्हे, तर सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक धरले होते. यामध्ये ‘भेसळमुक्त भारत, निरोगी भारत’ ‘भेसळयुक्त अन्न टाळा, निरोगी जीवन जगायला शिका’ ‘जिथे विठ्ठलाचे नाम, तिथे स्वच्छतेचे धाम’ ‘पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज’ ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा अनेक संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
विठ्ठल-रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेऊन निघालेली ही दिंडी शहरातील सराफ बाजार येथील पवार सरकार संस्थानच्या सोमेश्वर महादेव मंदिर येथे आली. या ठिकाणी बाल-गोपाळांनी सुंदर फुगड्या खेळत, टाळ वाजवत आणि भजन-कीर्तन करत हरिनामाचा जयजयकार केला.
यावेळी सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने पालखीचे पूजन करून दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, मराठा पंच हनुमान व विठ्ठल रुख्मिणी मंदिर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यात मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे, कारभारी नजन, प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र शिंगी, प्रफुल्ल पांडे, सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी सर्व बालवारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.
या अभूतपूर्व सोहळ्यात संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. संपूर्ण कोपरगाव शहर या दिंडीमुळे विठ्ठलमय झाले होते.

