अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे कार्य दिशादर्शक:– कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे…


शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन उत्साहात साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथील अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशी गोवंश संवर्धनाला आधुनिक संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत पशुपालनाची जोड देणारा हा उपक्रम राज्यातील शेतकरी, पशुपालक, संशोधक, कृषि विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ज्ञान, अनुभव व प्रेरणेचा अनोखा मेळा ठरला. या वेळी शाश्वत देशी गोपालन या विषयावरील देशी गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा राज्याचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचे भावपूर्ण स्मरण करून त्यांची शेतीशी असलेली नाळ अत्यंत घट्ट होती, असे सांगितले. देशी गाईंचे महत्त्व त्यांनी वेळेवर ओळखून या संशोधन केंद्राला मोठे पाठबळ दिल्यामुळे आज येथे देशी गोवंश संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या केंद्रात सध्या विविध देशी गोवंशाच्या 13 जातींचे संगोपन केले जात असून, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनाची नवी दिशा विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे हे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. शेतकर्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविणे हे कृषि विभाग आणि कृषि विद्यापीठांचे समान ध्येय असल्याचे सांगत त्यांनी सिंचन, सहकार, ग्रामीण विकास आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधनाधिष्ठित शेती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याचा शासनाचा निर्णय महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
ऑनलाईन संदेशाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्राताई पवार यांनी शुद्ध देशी गोवंशाचे शाश्वत शेतीतील महत्त्व अधोरेखित करत देशी गोवंशाचे जतन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे चित्रफितीद्वारे सांगितले. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेले हे संशोधन केंद्र देशातील सर्वोत्तम केंद्र बनावे आणि देशी गोवंश संवर्धन ही व्यापक सामाजिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अर्पण करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून या संशोधन केंद्राला तब्बल 72 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे केंद्राच्या विकासाला नवे बळ दिले आहे. या निधीच्या माध्यमातून केंद्राला जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र बनविण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. खर्चे म्हणाले की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक शेतीच्या विस्तारासाठी तसेच भारतीय सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी देशी गोवंशाचे महत्त्व अधिक वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय परिसंवादात देश-विदेशातील शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवून देशी गोवंश संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, कृषि महाविद्यालय, पुणे येथील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागात आज हे संशोधन केंद्र कार्यरत आहे, त्या विभागाचा इतिहास 1878 सालापासूनचा असून हा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी अजितदादा पवार यांनी भरीव योगदान दिले. देशी गोवंशाच्या जतन, संवर्धन आणि संशोधनाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे कृषि आयुक्त श्री. सुरज मांढरे यांनी मुख्यमंत्री यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत कृषि शिक्षण, संशोधन आणि प्रशासन यांच्यात अधिक समन्वयाची गरज अधोरेखित केली. कृषि विद्यापीठे, कृषि विभाग आणि संलग्न संस्था यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास शेतकर्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या देशी गायींची उपलब्धता वाढविण्याची गरज व्यक्त करत सर्व संशोधन केंद्रांना एकत्रित करून उत्कृष्टता केंद्र विकसित करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गुजरातमधील बन्सी गीर गौशाळेचे संस्थापक श्री. गोपालभाई सुतारिया यांनी देशी गायीच्या शेणावर आधारित जैविक उत्पादनांची माहिती देताना, त्यांनी विकसित केलेल्या जिवाणू संवर्धकामुळे ऊस, हळद, कापूस, लाल केळी, सोयाबीन आदी पिकांमध्ये उल्लेखनीय उत्पादनवाढ झाल्याचे नमूद केले आणि या तंत्रज्ञानाबाबत महात्मा फुले कृषि विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शाश्वत देशी गोपालन या विषयावरील मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच देशी गोवंशाचे जतन व संवर्धन करणार्या विविध गोपालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, आमदार मा. श्री. शंकर मांडेकर, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. दत्तात्रय उगले, मा. श्री. शशिकांत तरंगे, सभापती मा. श्री. अमोल नलावडे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष मा. श्री. अरुण चांभारे, गोसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. श्री. शेखर मुंदडा, कृषि सचिव मा. श्री. परिमल सिंह, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक मा. श्री. राहुल महिवाल, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्टाता कृषि तथा शिक्षण संचालक डॉ. सात्ताप्पा खरबडे, कृषि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद डोके, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, सहशास्त्रज्ञ डॉ. धीरज कणखरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, शेतकरी पशुसखी , कृषि सखी, बचत गटातील महिला आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी केले, तर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी आभार मानले.
