सहकाराचा महामेरू हरपला:- माऊली महाराज संगमनेरकर…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील सहकार, चळवळीला दिशा देण्याचे उत्तुंग काम केले. सात दशके त्यांनी समाजकारण, राजकारण, शिक्षण, शेती, सहकार, सांस्कृतीक, साखर कारखानदारी आदि क्षेत्रांत केलेले काम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. सहकाराचा महामेरु आपल्यातून गेला असे प्रतिपादन हभप माऊली महाराज संगमनेरकर यांनी केले.
तालुक्यातील कोळपेवाडी येथे म्हसोबा महाराज प्रांगणात रविवारी आठवे पुष्प गुंफताना स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देताना हभप माऊली महाराज संगमनेरकर बोलत होते, अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.
श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी संघर्षातून संजीवनी परिसराला उभे केले. त्याचा नावलौकिक देश विदेशात निर्माण करण्यासाठी सातत्याने सहकारात वेगवेगळे पायलट प्रकल्प पूर्ण करून सहकाराला मोठी दिशा दिली आहे. त्यांना साथ करणारे अनंत कार्यकर्ते होते. प्रत्येकाच्या सुख-दुःखात स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेले योगदान आजही मतदारसंघवासियांच्या स्मरणांत आहे. त्यांना आपल्यातून जाऊन आठ महिने झाले पण सतत त्यांची आठवण होते.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी येसगांव गांवच्या सरपंच पदापासून सुरु केलेली कारकिर्द देश पातळीवर जाऊन पोहोचली. १९७२ ते १९८५ आणि १९९० ते २००४ या विधानसभा कार्यकाळात त्यांनी वंचित समाजाचे प्रश्न सोडवुन महसुल, सहकार, कृषी, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणi मंत्रीपदासह विधानसभेचे हंगामी सभापतीपदी केलेले काम कायम स्मरणात राहिल. कार्यकर्त्यांना मोठे करून त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देऊन राजकीय मध्य साधला.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या नेत्रदिपक प्रगतीत सभासद शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि स्व. शंकरराव कोल्हे यांची निर्णयक्षमता सहकारात सर्वांनाच पुढे घेऊन गेली आहे.
ह भ प माऊली महाराज संगमनेरकर महाराज पुढे म्हणाले की, गुरु शुक्राचार्य यांनी कोपरगाव बेट परिसरासह संपूर्ण तालुक्याला अध्यात्मिक ऊर्जेसह वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांचा संजीवनी मंत्र खरोखरच अलौकिक आहे, त्याच मंत्राच्या जोरावर स्व. शंकरराव कोल्हे यांनी माळरानावर संजीवनी फुलवत असंख्य बेरोजगारांच्या हाताला काम देऊन अनेकांचे संसार प्रपंच फुलवले आहे. सहकारात जी प्रगती आहे ते त्यांचे कर्तुत्व आहे आणि त्यांची दुसरी, तिसरी पिढी हे कार्य नेटाने पुढे नेत आहे.
याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव संचालक विलास वाबळे, मनेश गाडे, राजेंद्र कोळपे, मोहनराव वाबळे, रघुनाथ फटांगरे, निवृत्ती कोळपे, बाळासाहेब पानगव्हाणे, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव कदम, प.पू. परसराम गिरी महाराज, रामनाथ चिने, किरण कोळपे, एल. डी. पानगव्हाणे, सुकदेव कोळपे, दत्तात्रय पानगव्हाणे, संतोष जाधव, पी. आर. काळे, बाबासाहेब कोळपे, दिपक ढोणे, राजेंद्र देशमुख, पोपटराव जुंधारे, अमोल गवळी, माधवबाबा गोसावी, सतिष बोरावके, परशराम वाबळे, पुंजाजी राऊत, शिवाजीराव निंबाळकर यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाजप कार्यकर्ते तसेच कोळपेवाडी पंचक्रोशीतील सर्व गावांचे भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- कोपरगाव
कोळपेवाडी येथे आठवे पुष्प गुंफताना स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देताना हभप माऊली महाराज संगमनेरकर, समवेत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *