कोपरगांव प्रतिनिधी:-
शहरातील खडकी प्रभागातील नागरी सुविधेची कामे आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करून मंजुर करून घेतली असुन १ कोटी २८ लाख १९ हजार ८४१ रूपये खर्चाच्या ई निवीदास्तरावर आहे ती तात्काळ सुरू करावी अन्यथा त्याविरूध्द नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा माजी नगरसेविका श्रीमती ताराबाई गणपत जपे यांनी दिला.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे श्रीमती ताराबाई जपे यांनी याबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, खडकी प्रभागात जाधव घर ते नाईकवाडे घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण करुन कॉक्रीटीकरण करणे. (अंदाजपत्रकीय रक्कम – २७,८१,५००/- ), घुमरे घर ते संचेती घर ते राजु मोरे घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण करुन कॉक्रीटीकरण करणे. (अंदाजपत्रकीय रक्कम – २७,८१,५००/- ), महाजन गोठा ते गरकल घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण करुन कॉक्रीटीकरण करणे. ( अंदाजपत्रकीय रक्कम ५८,०३,७००/- ) आणि ४) प्र.क्र. १ मध्ये नाईकवाडे घर ते चरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे. ( अंदाजपत्रकीय रक्कम -९,७०,१००/- ) ५) प्र.क्र. १ मध्ये खडकी भागातील गणपती मंदीर आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे. (अंदाजपत्रकीय रक्कम ४,८३,०४१/- ) ही कामे मंजुर झाली असुन त्याच्या ई निवीदा निघाल्या आहेत. ही कामे होत नसल्यांने या प्रभागातील रहिवासीयांना, विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, पावसामुळे रस्त्यावर चिखल असल्याने विद्यार्थ्यांना त्यांची वाहने अन्यत्र उचलुन त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तेंव्हा नगरपालिका प्रशासनाने ही कामे तात्काळ सुरू करावीत व खडकी प्रभागातील रहिवासीयासाठी पुरेशा प्रमाणात सुविधा पुरवाव्यात अन्यथा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नाईलाजास्तव येथील सर्व रहिवासीयांसह उपोषणास बसावे लागेल असेही शेवटी श्रीमती ताराबाई जपे म्हणाल्या.

फोटो ओळी:- कोपरगाव
खडकी प्रभागातील नागरी सुविधेची कामे तात्काळ सुरू करावीत या मागणीचे निवेदन मुख्यiधीकरी शांताराम गोसावी यांच्याकडे श्रीमती ताराबाई जपे यांनी दिले.
