
कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
देवळाली नगरपालिकेतील ठेकेदारीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना किमान वेतन व त्याचा फरक अदा करावा यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील प्रहार च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
निवेदनात आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा शहराचे घनकचरा व्यवस्थापन चे काम खाजगी ठेकेदार मार्फत सुरू आहे. सदर ठेकेदारकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्याना किमान वेतन मिळत नसलेबाबत आम्ही नगरपालिकेचे निदर्शनास आणून दिले होते, त्यावर आपण तात्काळ कार्यवाही करत कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२ पासून किमान वेतन लागू केले आहे, कर्मचाऱ्यांची बँकेत खाते उघडून त्यांचे वेतन बँकेत जमा करणेचा चांगला निर्णय आपण घेतला या बद्दल मी आपले विशेष आभार मानतो.
महोदय आपण किमान वेतन जानेवारी २०२२ पासून लागू करणेचा निर्णय घेतला, परंतु त्या अगोदर गेली पाच वर्षे काम करणाऱ्या वेगवेगळ्या खाजगी ठेकेदारांनी स्वच्छता व इतर कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलेले नाही. कामगारांचे किमान वेतन डावलून त्यांचे आर्थिक शोषण करणे हा अक्षम्य गुन्हा आहे हे आपण जाणता, तेंव्हा गेल्या पाच वर्षे काम केलेल्या स्वच्छता व इतर कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे मिळणारा पगार व प्रत्यक्षात दिलेला पगार यातील फरक मिळणे आवश्यक आहे, तरी या बाबत आपण लक्ष घालून हा फरक देणेबाबत कार्यवाही करावी.


नगरपालिका प्रशासन हा महाराष्ट्र शासनाचा एक अंगीकृत भाग आहे. या शासकीय यंत्रणेत ठेकेदार काम करीत असताना तो कामगारांना किमान वेतन देतो किंवा नाही हे पाहणे एक पालक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. या विषयावरून ठेकेदार व कामगारांत कटुता येऊन नको ते प्रसंग घडू नयेत म्हणून आपण या बाबत विशेष खबरदारी घ्यावी व त्यांच्या हक्काचे फरकाची रक्कम त्यांना मिळवून द्यावी अशी विनंती निवेदनात ढुस यांनी केली आहे..
प्रसंगी आप्पासाहेब ढुस यांचे समवेत प्रहार दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष व राहुरी तालुका सल्लागार सलीमभाई शेख, देवळाली प्रवरा संपर्क प्रमुख ऊमर मौलाना शेख, सचिव सुखदेव कीर्तने, सुनिल कदम, भाग्यश्री कदम, विजय कुमावत, प्रभाकर कांबळे, आशा माळी , जोती थोरात, कवीता सरोदे, आलका लांडे, मथुरा सुरेवंशी, सुनिता म्हस्के, लीला नंदु आश्वीनी, मिरा पवार, सुनिता सरोदे, तारा विधाटे, नंदा पंडीत, संगीता ओहोळ, मिरा गायकवाड, शोभा रानडे, कमल बर्डे, कमल संसारे, स्वाती सेलार, मिरा सरोदे, ताई आडांगळे आदि उपस्थित होते.
