नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्वताची तसेच स्वताच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी:- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री १० ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी फिरणार्‍यांवर आता निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. मास्क न घालता फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्वताची तसेच स्वताच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, विनाकारण अनावश्यक रित्या घराबाहेर पडणे टाळावे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही यादृष्टीने सतर्क झाली असून महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या प्रमुखांसोबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठक घेऊन यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत. त्यानंतर महानगरपालिका आणि इतर तालुक्याची ठिकाणे तसेच गावपातळीवरही विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, लॉन्स चालक यांनाही परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाली तर कारवाई बडगा उगारण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भात तालुकापातळीवरही टास्क फोर्स, विविध यंत्रणा, विविध विभाग, महामंडळे, शाळा-कॉलेजेस यांचे व्यवस्थापन आदींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहेत.
👉घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा.
👉 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.
👉स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.
👉अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *