लॉकडाउनचा सदुपयोग डहाळेच्या हातुन दासबोधाचे लिखाण:-महंत रामगिरी…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
मनुष्याला आवड असली की सवड आपोआप होते, गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीचे दुष्पपरिणाम संपुर्ण जगावर झाले, सर्वत्र लॉकडाउन परिस्थिती, त्याचा सदुपयोग ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांचे शिष्य रंगनाथ किसन डहाळे सर यांनी केला आणि हस्तलिखीत दासबोध लिहुन काढले ही बाब सर्वांना मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबांच्या ३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत रंगनाथ डहाळे सर यांनी महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते दासबोध अर्पण केला त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सज्जनगडस्थित समर्थ रामदास स्वामी यांच्यावरही गीतेचा प्रभाव होता. त्यांनी संपूर्ण जगाला आपल्या वाड:मयातुन ऐहिक सुखापासुन ते मोक्षापर्यंतचा पल्ला कसा गाठायचा याची शिकवण दिली आहे. रणांगणाच्या भूमि वरील श्रीकृष्ण संवादातुन गीता तयार झाली, तद्द्ववत गुरू आणि शिष्यातील संवादामधुन दासबोध घडला., मनाचे श्लोक तयार झाले. समर्थ रामदास स्वामींनी ४०० वर्षापुर्वीच या भूतलावर घडणा-या घटकांची व्याप्ती दासबोधात लिहुन ठेवली आहे. शंकर हरिभाउ कोल्हटकर उर्फ ब्रम्हलिन संत रामदासीबाबांनी गुरू विनायक महाराज मसुरकरांच्या आज्ञेने कोकमठाण तीर्थक्षेत्री स्वतःला सिध्द केले. रंगनाथ डहाळे सर यांनी देखील लॉकडाउन काळात दासबोध लिहुन गुरूप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा हे देखील त्यांनी हस्तलिखित लिहून काढले आहे. कृष्णागोदाकाठचे योगी रामदासीबाबा, तीनखणीचा रामानूभव, रामदासीबाबा आणि समर्थविचारधारा या पुस्तकांच्या लेखानातुन रंगनाथ डहाळे सर यांनी बाबांचे चरित्र आणि ध्यास तुम्हां आम्हां समोर चितारण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रेरणा युवकांनी घ्यावी व समर्थ सांप्रदायातुन परमेश्वरी ध्यास अखंड तेवत ठेवावा असे अवाहन महंत रामगिरी महाराजांनी शेवटी केले. रामदासीबाबा भक्त मंडळाच्यावतीने त्यांचा व सुपुत्र किरण डहाळे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना रंगनाथ डहाळे म्हणाले की, ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी जीवनात कुठलीही आसक्ती न ठेवता प्रामाणिकपणाची वाट निवडत जो भेटेल त्याला भक्तीमार्ग दाखवत सर्वांचे कल्याण केले, त्यामुळे ती व्यक्ती नसुन संपुर्ण विचार आहे, त्यांच्या साधनेतुन आपोआप कुठलेही कार्य सिध्दीस जाते हा आत्मानुभव बोलुन दाखविला.

फोटोओळी:-
कोपरगांव श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबांच्या ३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत रंगनाथ डहाळे सर लिखीत दासबोधाचे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते तीनखणीस अर्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *