Uncategorized

कोपरगाव मतदार संघातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त टँकरची तरतूद करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आराखडा तयार करतांना गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची गावे वगळता तालुक्यातील इतर सर्व गावांना जास्तीत जास्त टँकर वेळेवर उपलब्ध होतील असा आराखडा तयार करा. तसेच कालव्यांना वेळेत आवर्तन न मिळाल्यास लाभक्षेत्रातील त्या गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पिण्याच्या पाण्याचे जास्तीत जास्त टँकर उपलब्ध होतील अशी आराखड्यात तरतूद करावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या.

कोपरगाव तालुक्यात अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केल्यामुळे कोपरगाव मतदार संघ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात येवून ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर शेती पिकांचे पंचनामे करून करावयाच्या तातडीच्या उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यादृष्टीने पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून आराखडा तयार करण्यात येत असून याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
जून महिना कोरडाठाक गेल्यामुळे भविष्यातील संकटाची चाहूल लागली होती. परंतु जुलै महिन्यात काहीसा समाधानकारक व धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडण्याच्या केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील बंधारे, गाव तलाव आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु ऑगस्ट, सप्टेबर आणि निम्मा ऑक्टोबर महिना संपत आला असून पाऊस होण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.सध्या काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी भविष्यात गोदावरी कालवे लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची गावे वगळता सर्वच गावांना टँकर सुरु करावे लागणार आहे.त्यामुळे आराखड्यात या गावांना जास्तीत जास्त टँकर मिळण्याची तरतूद करावी.

तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने भूजल पातळी खालावत चालली असून बाष्पीभवनाचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोदावरी कालव्यांना वेळेत आवर्तन मिळाले तर कालव्यांच्या लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या गावांना अडचणी येतील असे वाटत नाही. परंतु पुढील परिस्थिती कशी असेल याबाबत आजच अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळे यदाकदाचित जर वेळेवर आवर्तन मिळाले नाही तर या गावांना देखील टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे याची गांभीर्याने दखल घेवून त्याबाबत आराखड्यात नियोजन करून शासनाकडे जास्तीत जास्त टँकरची आराखड्यात तरतूद करावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *