आ. आशुतोष काळे यांनी अभीनेते स्व.नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत केली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:-
रोखठोक स्वभाव, परखड व्यक्तिमत्त्व आणि आपल्या दमदार अभिनयाने ज्येष्ठ सिनेअभिनेते स्व.नाना पाटेकर यांनी रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण केले होते. भूमिका कोणतीही असो, आपल्या अभिनयाच्या सामर्थ्याने प्रत्येक भूमिका अजरामर करणारा हा असामान्य नटसम्राट आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि संकटग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, संवेदनशील मन आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.
स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जानेवारी महिन्यात विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन आणि आता नाना पाटेकर यांचे झालेलेअकस्मात निधन या दोन्ही घटना अत्यंत दुःखद असून अचानक अशा व्यक्तींचे जाणे ही मनाला चटका लावणारी बाब आहे.दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार आणि ज्येष्ठ अभिनेते स्व.नाना पाटेकर हे चांगले मित्र होते व महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत होते.आपल्या प्रभावी वक्तृत्वातून जनसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यात होती. मनमोकळा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि आपुलकीची वागणूक यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. या दोन्ही व्यक्तिमत्वांचे असे अकस्मात जाणे ही महाराष्ट्राच्या जनमानसासाठी अत्यंत वेदनादायी आणि न भरून येणारी हानी आहे.
ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांनी एक हरहुन्नरी कलावंत, परखड व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील माणूस गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी निश्चितच जाणवत राहील. या महान कलावंताच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!- आ.आशुतोष काळे.
