Uncategorized

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा ; १३ गावांतील शेतकऱ्यांचा रात्री पाणी भरण्याचा त्रास संपला:- सरपंच गजानन मते…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:-आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत रांजणगाव देशमुख व अंजनापूर येथे ३२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या १० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा रात्री पाणी भरण्याचा त्रास संपला आहे. या प्रकल्पामुळे जवळपास १३ गावातील शेतीपंपांना आता दिवसा अखंडित वीज मिळत असून शेतकऱ्यांच्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढल्याबद्दल रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते यांनी १३ गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.
कायमस्वरूपी जिरायती भाग अशी ओळख असलेल्या कोपरगाव मतदार संघातील बहादराबाद, धोंडेवाडी, बहादरपूर, जवळके, वेस,सोयेगाव, अंजनापूर, रांजणगाव देशमुख, मनेगाव, डांगेवाडी, शहापूर, काकडी, मल्हारवाडी आदी गावांसाठी काळे परिवार तारणहार ठरला असून ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शिवाय पर्याय नव्हता त्या गावांसाठी माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी स्वखर्चातून उजनी उपसा जलसिंचन योजना चालविली.निळवंडेचे पाणी गावागावात पोहोचवून ते लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसे पोहोचविता येईल त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात त्यासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी ते सोडवत आहेत.

आशुतोष काळे यांनी आमच्या १३ गावातील नागरीकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी तर उपलब्ध करून दिले आहेच. परंतु शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचनासाठी पाणी देतांना बिबट्याचे संकट असतांना जीव धोक्यात घालावा लागत होता. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आमच्या जीविताला असणारी भीती, व विहिरीत व कूपनलिकेत पाणी असूनही विजेच्या समस्येमुळे पिकांना पाणी देण्यात येणाऱ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्या अडचणी दूर करण्यासाठी रांजणगाव देशमुख व अंजनापूर येथे ३२ कोटी रुपयांच्या निधीतून १० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होवून शेतकरी रात्री सुखाने झोपत आहे.त्यामुळे आमच्या १३ गावातील शेतकरी व नागरीक आमदार आशुतोष काळे यांना कधीही विसरणार नाही असे सरपंच गजानन मते यांनी शेवटी म्हटले आहे. तसेच कोपरगाव मतदार संघात अशाच प्रकारे आणखी ६ सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी रवंदे येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाली आहे. वारी व येसगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून चास नळी, दहेगाव व कोकमठाण येथील येथील कामे प्रगतीपथावर असून हे प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन त्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या अखत्यारीत येणाऱ्या त्या गावातील शेतकऱ्यांना देखील दिवसा वीज मिळून त्यांचाही त्रास लवकरच संपणार आहे असा विश्वास रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *