कर्मवीर अण्णांमुळे बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात :- सर्जेराव मते…

श्री रामेश्वर विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात…
कोपरगाव प्रतिनिधी:”कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारत आणि भीषण दारिद्र्यावर मात करत बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व स्वाभिमान रुजवला. त्यांच्या याच दूरदृष्टी आणि त्यागामुळे आज बहुजन समाजातील पिढ्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सर्जेराव मते यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयात शुक्रवारी (दि.२५) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्यानिमित्त व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तथा पत्रकार रोहित टेके होते. मुख्याध्यापक शरीफ शेख यांनी केले.
या सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेशराव बोळीज, माजी मुख्याध्यापक छबुराव पाळंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक शरीफ शेख, स्कूल कमिटी सदस्य मच्छिंद्र टेके, ॲड.शरद जोशी, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, माजी न्यायाधीश अशोकराव थोरात, बाबासाहेब शिंदे, ॲड.अमोल टेके, नरेंद्र ललवाणी, गोरख टेके, हभप विनायक महाराज टेके, सतीश कानडे, नानासाहेब टेके, सुरेश जाधव, संजय जाधव, अशोक कानडे, किरण काळे भाऊसाहेब टेके, मच्छिंद्र गांगड, दीपक चौधरी, शरद सांगळे, सतीश बारहाते,दौलत वाईकर, दिनेश निकम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अण्णांची प्रतिमापूजन करून करण्यात आली.
पुढे बोलताना आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या व्याख्यानात सर्जेराव मते यांनी कर्मवीर अण्णांच्या बालपणातील प्रसंगांपासून ते रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीपर्यंतच्या खडतर प्रवासाचा आढावा घेतला. अण्णांचा स्वाभिमानी बाणा विशद करताना त्यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे मिस्टर कूप व महात्मा गांधीजींसोबतच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला.
लोकसहभागातूनच शैक्षणिक संस्था समृद्ध होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात आणि स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विद्यालयाच्या विकासात योगदान देणाऱ्या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपसरपंच विजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून रामेश्वर विद्यालयास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मच्छिंद्र टेके यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ॲड. संदीप वर्पे यांनी कोपरगाव येथील एसएसजीएम कॉलेजतर्फे श्री रामेश्वर विद्यालयासाठी ३ लाख १५ हजार ४५० रुपये किमतीचे साहित्य मंजूर करण्यात आले असून यामध्ये प्रयोगशाळा व वर्गांसाठी टेबल्स, कपाटे आणि १०० खुर्च्यांचा समावेश असून, हे साहित्य लवकरच शाळेला हस्तांतरित केले जाईल,”रयतच्या शाळांमधील प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि संस्था प्रशासन थेट संपर्कात आहोत. राजकीय गट-पक्ष बाजूला ठेवून विद्यालयाच्या भौतिक सुधारणा आणि गुणवत्तेसाठी आम्ही पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहू.” ॲड. वर्पे यांनी सांगितले.
सुरेशराव बोळीज म्हणाले, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रोहित टेके हे तरुण आहेत. त्यांच्या पुढाकारातून विद्यालयाचा गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात भौतिक विकास झाला आहे. त्याचबरोबर संस्थेची “पवित्र पोर्टल”द्वारे भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून आदेश तयार झाले आहेत. येत्या १ ऑक्टोबरपासून शाळेला आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील. लहान शाखांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशा शाळांमध्ये पूर्ण शिक्षक भरतीला प्राधान्य दिले जाईल. तसेच तरुणांमधील ऊर्जा पाहता, आगामी काळात प्रत्येक स्कूल कमिटीमध्ये राजकारण बाजूला ठेवून एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि दोन युवकांचा समावेश करण्याचा धोरणात्मक प्रस्ताव मांडणार असल्याचेही बोळीज यांनी यावेळी नमूद केले. अध्यक्षाीय भाषणात रोहित टेके यांनी विद्यालयाच्या विकासासाठी स्थानिक कमिटी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक छबुराव पाळंदे सर, तुळशीराम नांगरे, जितेंद्र टेके, अरविंद गोर्डे, आदिनाथ वायडे या दातृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत जाधव, रवींद्र रासकर यांनी तर कैलास शेळके यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शरीफ शेख, कैलास शेळके, वसंत जाधव, तुकाराम जेठे, सिताराम झुराळे, रवींद्र रासकर, सुरेश जमदाडे, शिवाजी धट, योगिता कर्डेल, शालिनी कर्पे, अनिसा पठाण, विजय थोरात यांच्यासह स्थानिक स्कूल कमिटी, विद्यालयातील सर्व कमिट्यांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
