महात्मा फुले कृषि विद्यापीठात फुले हरित अभियानाची सुरुवात:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे…


कोपरगाव प्रतिनिधी:-
(राहुरी विद्यापीठ):-
जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने व कर्मचार्याने एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. यावर्षीपासून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी आज फुले हरित अभियानाची सुरुवात करत आहोत असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणलोट क्षेत्र व प्रशिक्षण केंद्रामार्फत पाणलोट क्षेत्र परिसरात फुले हरित अभियानांतर्गत तसेच उद्यानविद्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी वृक्षरोपण करतांना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. विजयकुमार पाटील, सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. साताप्पा खरबडे, विजू अमोलिक, डॉ. सचिन नलावडे, डॉ. सचिन नांदगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक करतांना डॉ. सचिन नांदगुडे म्हणाले की या पाणलोट क्षेत्राचा परिसर 1200 हेक्टरचा आहे. या 1200 हेक्टरवर पाणी साचवून ठेवण्यासाठी खोल सलग समतल चर, बंदिस्त वाफे, नाला बंडींग करण्यात आलेले असून त्यामुळे या क्षेत्रात 123.40 टी.सी.एम. पाणी अडवले व जमिनीत मुरवले जात आहे. या पाणलोट क्षेत्रामध्ये यावर्षी 2532 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये बांबू व हिरडा, बेहडा, अर्जुन, जांभूळ व आंबा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी उद्यानविद्या विभागाचे सर्व कर्मचारी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील एन.सी.सी., एन.एस.एस. व इतर विद्यार्थी यांनी वृक्षारोपन केले.
