तुझ्या देखील तब्बेतीची काळजी घे; शरदचंद्र पवारांचा आमदार आशुतोष काळेंना भावनिक सल्ला..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-

कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोना बाधित रुग्णांसाठी तू करीत असलेले काम अतिशय उत्तम आहे. तुझी जबाबदारी तू प्रामाणिकपणे पार पाडीत आहे मात्र या जीवघेण्या संकटात तू जशी इतरांची काळजी घेतो तशीच काळजी तुझ्या देखील तब्बेतीची घे असा भावनिक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिला.
आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. आपण दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऑक्सिजन प्लँट उभारणार असल्याची माहिती देवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी शरदचंद्रजी पवार यांना दिली. मागील वर्षापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्र आर्थिकदृष्ट्या बाधित झाले आहे. इंधनाच्या वाढत्या दराने शेतीच्या मशागतीचा खर्च अगोदरच वाढला आहे. तरी देखील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत होते मात्र खतांच्या वारेमाप किंमती वाढल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते.अशा परिस्थितीत खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांनी पाऊल उचलले त्याबद्दल त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी आभार देखील मानले.
यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांनी कोरोना निर्मूलनासाठी केलेल्या उपाय योजनांचे शरदचंद्रजी पवार यांनी कौतुक केले. दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता तू करीत असलेल्या धडपडीचा व तुझ्या उपाय योजनांचा नागरिकांना निश्चितपणे उपयोग झाला आहे. कोणतीही संकटे कायमस्वरूपी नसतात. संकटे येतात आणि जातात त्या संकटासमोर आपण टिकाव धरून ठेवला पाहिजे. या कोरोना संकटात नागरिकांसाठी तू करीत असलेल्या कार्यात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मदत करण्याची ग्वाही देवून तब्बेतीची काळजी घेण्याचा पवारांनी सल्ला दिला.

फोटो ओळ:-
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची आमदार आशुतोष काळे यांनी भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *