मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 39 वा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ रविवार दि. 15 मार्च, 2026 रोजी सकाळी 10.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. जिष्णू देव वर्मा हे उपस्थित असणार आहेत. या पदवीप्रदान समारंभामध्ये मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्री. राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे आणि वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी नवी दिल्ली येथील भाकृअप-भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि भाकृअप-भाकृसंसं अनुवंशशास्त्र विभागाचे मानद शास्त्रज्ञ डॉ. अशोक कुमार सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पदवीप्रदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 4,602 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती मा.श्री. जिष्णू देव वर्मा यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील 4,182 स्नातकांना पदवी, 346 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 74 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी 42 यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *