कोपरगावभूमीच्या कन्येने अभिमानाने मान उंचावली :- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

ग्रामविकास विभागात वैशाली डिगे (दामरे) यांची उपसचिवपदी पदोन्नती…
कोपरगाव प्रतिनिधी:-
एकेकाळी खेड्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली एक कन्या आज थेट महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात उपसचिव या उच्च पदावर नियुक्त होत आहे, ही बाब कोपरगावसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

वैशाली शिवकुमार डिगे–दामरे यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात उपसचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना कोल्हे म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःची जडणघडण घडवत, कष्ट, अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर वैशाली डिगे यांनी ही यशस्वी गरुडझेप घेतली आहे.
त्यांच्या या यशामागे वडील गुरुनाथ दामरे आणि आई प्रभावती दामरे यांचे संस्कार, पाठबळ आणि कुटुंबातील शिस्त महत्त्वाची ठरली असल्याचे सांगत स्नेहलताताईंनी पालकांचे विशेष कौतुक केले.यासह भाऊ प्रशांत दामरे आणि प्रवीण दामरे यांचीही साथ लाभल्याचे सांगत कोल्हे कुटुंबाचे व येसगाव परिसराशी या दामरे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असून, या मातीतून घडलेली कन्या आज राज्याच्या ग्रामीण विकासाची जबाबदारी सांभाळणार आहे, याचा विशेष अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील सक्षम, समृद्ध आणि स्वावलंबी ग्रामीण महाराष्ट्र घडवण्यासाठी वैशाली डिगे यांना मोठी संधी मिळत असून, त्यांची बुद्धिमत्ता, प्रशासकीय अभ्यास आणि निर्णयक्षमता महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची ठरणार असल्याचा विश्वास स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केला.
कोपरगावच्या जनतेचे प्रश्न घेऊन मी आपल्याला नक्की भेटेल आणि माहेरच्या कामासाठी आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एका महिला म्हणून घेतलेली ही यशस्वी गरुडझेप प्रेरणादायी असून, या भूमीची कन्या उच्च पदावर पोहोचणे ही कोपरगावसाठी भूषणावह बाब असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी सांगितले.यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *