

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये संवत्सर रामवाडी येथील कुस्तीपट्टू युवराज मनोजराव ढमढेरे यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
जम्मू काश्मिर येथे स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने खुल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २०ते२१जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये संपूर्ण भारतातील दिल्ली, हरयाणा,पंजाब,कर्नाटक,गुजरात, मध्यप्रदेश,तेलंगणा,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसह अनेक राज्यातील कुस्तीगीर यास्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करीत विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट संचलित आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील २५ मल्लांनी या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.
यास्पर्धेमध्ये युवराज मनोजराव ढमढेरे यांनी १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल यांचा श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी पशुवैद्यकीय डॉ.दिनेश नेहे,भरतराव ढमढेरे व सिंधुताई ढमढेरे यांसह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
कुस्तीगीर युवराज ढमढेरे यांनी १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून कोपरगावच्या शिरपेचात मानचा तुरा रोवल्याबद्दलकोपरगावच्या प्रथम महिला आमदार मा.सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी ही कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
