
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर अवास्तव प्रमाणात केलेली करवाढ अन्यायकारक असून सर्वसामान्य नागरिक व छोट्यामोठ्या व्यावसायिकांसाठी आर्थिक अडचणीचे आहे. त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना महामारीचा सामना करतांना मागील काही महिन्यापासून जनजीवन पूर्व पदावर येत आहे. यातून बाजारपेठ कुठेतरी सावरत आहे. मात्र अशा परिस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकला आहे. त्यामुळे याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने वाढविलेल्या कराबाबत समस्त कोपरगाव शहरवासियांचा विचार करून याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन वाढविलेला कर कमी करावा याबाबत दुपारी ४.०० वा. कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी कोपरगाव शहरातील व्यापारी संघटनांनी, नागरिकांनी व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने गौतम बँक कोपरगाव या ठिकाणी उपस्थित राहावे. गौतम बँकेजवळ व्यापारी संघटना, नागरिक, व्यावसायिक सर्व एकत्र येऊन कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
